ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात हिवाळ्याची चाहूल : तापमानात झपाट्याने घट !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात हिवाळ्याची चाहूल आता प्रत्यक्ष जाणवू लागली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे गार वारे सुटायला लागले आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान झपाट्याने घसरू लागले असून, हवामान विभागाने पुढील सात दिवसांत तापमानात आणखी चार ते पाच अंश सेल्सियसने घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात घट होत आहे. पुणे जिल्ह्यात पहाटेचे तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. पुढील 48 तासांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता असून, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली आहे. हिमालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईसह किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी सांगितले की, या कालावधीत रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात घटेल. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी वातावरण थंड राहील, मात्र कोणताही नवीन इशारा देण्यात आलेला नाही. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढत असून, पहाटे गारठा आणि दुपारी किंचित उष्णता अशी स्थिती आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुढील तीन दिवस हवामानात मोठा बदल होणार नाही, मात्र थंडीची लाट कायम राहील. सीमावर्ती राज्यांमध्ये थंडीची तीव्रता जास्त असून, तिथे ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. ला-निनोच्या प्रभावामुळे यंदा थंडी जास्त वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत आणि थंडीपासून बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!