मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या ६ दिवसापासून जरांगे पाटलांचे उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती खालावत असल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे अशी देखील आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, मराठा समाजाला वेगळे टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच संपूर्ण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार अशी ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
यावेळी शिंदे म्हणाले, यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते आणि ते हाय कोर्टात टिकले होते. मात्र सुप्रीम कोर्टात रद्द झाले. आज मागासवर्ग आयोगाकडून महत्वाचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती शिंदेंनी दिली.
तसेच मंत्रिमंडळ बैठकीनंतर 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अधिवेशनात अहवालावर चर्चा होईल. हा अहवाल तयार करताना या कामात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि सर्व टीम काम करत होती. जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले होते त्या सर्वांची मदत मिळाली आणि ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या”, असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, ज्या प्रकारे हे अहवालाचे काम झाले ते पाहता मला असा विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे, ओबीसींना किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देता येईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच केवळ ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे असेही शिंदेंनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. ”20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन आहे. त्याआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मकपणे काम करत आहे. सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणे अयोग्य आहे. त्यांनी आंदोलन करायलाच नको होते. मात्र आता त्यांनी आंदोलन मागे घ्यावे”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.