जिल्ह्यात शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती
सोलापूर,दि.12 : जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्त शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी व महाविद्यालयामध्ये जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्वाचा भाग आहे. जनतेच्या स्वच्छतेविषयी जाणिवा समृध्द होवून सदृढ, निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्तरावर येत्या शनिवारी दि.१५ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी हात धुवा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात येणार आहे.
हात धुवा दिनाच्या संकल्पनेला धरुन अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्वाच्या वेळा विशेषतः स्वयंपाक करण्यापूर्वी, स्वयंपाक झाल्यावर, शौचाहून आल्यावर, जेवणापूर्वी, बाळाला जेवण भरविण्यापूर्वी, लहान बाळाची शी धुतल्यानंतर, झाडलोट केल्यानंतर, पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर, आजारी व्यक्तीच्या भेटीपूर्वी व नंतर, बाहेर खेळून, फिरुन आल्यानंतर साबणाने हात धुणे आवश्यक आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन ग्रामपंचायत तसेच शाळा, अंगणवाडी स्तरावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगताना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे आवश्यक आहे. शिवाय हात स्वच्छ न धुण्याचे फायदे तोटे सांगितल्यास वर्तन बदलास मदत होणार आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबत हात धुण्याचे महत्त्व व त्यांचा आरोग्यास होणारा फायदा याबाबत चर्चा व संवाद साधण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शालेय स्तरावर या दिवसानिमित्त हाताची स्वच्छता या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व पोस्टर तयार करणे आदी विविध प्रकारच्या स्पर्धा करण्यात याव्यात, असेही श्री. स्वामी यांनी सांगितले.
दरम्यान वैयक्तिक स्वच्छतेमध्ये स्वच्छ हात धुणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी नियमितपणे जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्यामुळे शनिवारी जागतिक हात धुवा दिनी जिल्ह्यातील सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./पाणी व स्वच्छता) इशाधीन शेळकंदे यांनी केले आहे.