मुंबई : वृत्तसंस्था
सोमवारपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यातील पावसाळा संपला असला तरी आता परतीच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात आसपासुन मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई बरोबरच पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात सलग पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यात 23 ते 25 सप्टेंबर याकालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा वजोरदार पाऊस, मंगळवारी ( 26सप्टेंबर) विजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, नाशिक व जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन तसेच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी जाहिरात फलकांच्या आजूबाजूला थांबू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बंगालच्या उपसागरातील सक्रिय कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पितृपक्षात हवामान पावसाळी राहील. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान 35 ते 36 अंशांपर्यंत गेल्याने जळगावकरांना ऑक्टोबर हीटचा तडाखा बसणार आहे. शहरासह जिल्ह्यात 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात काही प्रमाणात गारवा असेल. पण, 30 तारखेनंतर तापमानात कमालीची वाढ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचेल. ऑक्टोबरच्या शेवटी थंडीला सुरुवात होईल आणि पुन्हा हळूहळू तापमान घसरायला सुरुवात होईल. नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवामान ढगाळ आहे. सोवारीही मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता दिसते आहे.