मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला आहे. यावर आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांना आवाहन केले आहे.
मंत्री देसाई म्हणाले कि, मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी आता उगीचच आंदोलन करून जनतेला वेठीस धरण्याचे काम करू नये. मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात मंजूर झाले आहे. यामुळे शिक्षण व नोकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. सगेसोयऱ्याच्या अध्यादेशोावर 6 लाखांहून अधिक हरकती आल्या आहेत. यावर घाईगडबडीत निर्णय घेतला तर भविष्यात तोटा होईल, सरकार गत 7-8 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा अभ्यास करत आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी थोडा संयम बाळगावा. वयस्कर माणसांना उपोषणाला बसवून तुम्ही जनतेला वेठीस धरत आहात का? असा सवालही शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाचे विधेयक अधिवेशनात मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सगेसोयऱ्याबाबतचा अध्यादेश निघेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशातच जरांगे पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. यावरुनच शिवसेना शिंदे गटाचे नेते,मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला आहे.
अजय बारसकर हे आंदोलनात त्यांच्या सोबत होते. या यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. काही तक्रार केली तर सरकार दाखल घेईल. एकेक गोष्टी बाहेर येत आहेत. जरांगे पाटील यांनी नकारार्थी विचार थांबवावा, सरकारची यंत्रणा मोठी आहे ट्रॅप लावण्याची गरज नाही, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.