नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची किडनी बसवता येते. पण एखाद्या व्यक्तीला कधी प्राण्याची किडनी बसवल्याचं तुम्ही ऐकलंय का? वाचून धक्का बसेल, पण असं घडलं आहे. एका व्यक्तीला डॉक्टरांनी चक्क डुकराची किडनी बसवली आहे. विशेष बाब म्हणजे ही किडनी काम करत असून पेशंटची तब्येत देखील सुधारत आहे. डॉक्टरांच्या या अजब-गजब कारनाम्यामुळे अनेकजण चक्रावून गेले आहेत.
अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरातील डॉक्टरांनी झेनोट्रान्सप्लांटेशन म्हणजेच प्राण्यांच्या अवयवाचे मानवामध्ये प्रत्यारोपण करून दाखवलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या महत्त्वाच्या प्रगतीमुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आशेची नवीन दारे उघडली आहेत. दरवर्षी जगभरात किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेले लाखो रुग्ण आढळून येतात. यातील अगदी मोजक्याच रुग्णांना किडनी दान मिळते. उर्वरित लोकांना वेळेवर किडनी न मिळाल्याने त्यांचा जीव जातो. हीच बाब लक्षात घेता अमेरिकेतील डॉक्टरांनी झेनोट्रान्सप्लांटेशन म्हणजेच प्राण्यांच्या अवयवाचे मानवामध्ये प्रत्यारोपन करण्याचा प्रयोग सुरू केला आहे.
अगदी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत एका महिलेला डुकराची किडनी बसवण्यात आली होती. त्यानंतर या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. आता ६२ वर्षीय रिक स्लेमन नावाच्या व्यक्तीवर या शस्त्रक्रियेचा प्रयोग करण्यात आला आहे. रिक स्लेमन यांची किडनी खराब होती.
त्यांना किडनी प्रत्यारोपनासाठी डोनर मिळत नव्हता. अखेर डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना डुक्कराची किडनी बसवण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला स्लेमन यांच्या कुटुंबियांनी नकार दिला. मात्र, कुठलाही पर्याय न उरल्याने त्यांनी डुक्कराची किडनी बसवण्यास होकार दिला. वॉशिंग्टन येथील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये गेल्या शनिवारी (१६ मार्च) रोजी डॉक्टरांनी रिक स्लेमन यांच्यावर झेनोट्रान्सप्लांटेशन शस्त्रक्रिया करत त्यांना डुक्कराची किडनी बसवली. या शस्त्रक्रियेनंतर स्लेमन यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा दिसून आली. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.