ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, प्रियकरानेही केला आत्महत्येचा प्रयत्न !

सोलापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली आहे. अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सकाळी साडेदहाच्या सुमारास एका तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला, तर तिच्यासोबत असलेल्या तरुणानेही स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेत स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २०, रा. रामवाडी, सोलापूर) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आदित्य रमेश चव्हाण (रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झाली ओळख
स्नेहाच्या आईचे माहेर मैंदर्गी (ता. अक्कलकोट) असून, तिचे मामा तेथे वास्तव्यास आहेत. बारावीपर्यंतचे शिक्षण स्नेहाने मैंदर्गीत घेतले होते. याच काळात नागूरतांडा येथील आदित्य चव्हाण याच्याशी तिची ओळख झाली. ही ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली. आदित्य स्नेहाला मोबाइलवरून सतत संपर्क साधत ‘तुझ्याशीच लग्न करणार’ असे म्हणत असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र स्नेहाच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. “तू तिच्याशी बोलू नकोस, पुन्हा घराकडे येऊ नकोस, आम्ही हे लग्न लावून देणार नाही,” असे स्पष्टपणे सांगूनही दोघांमधील संपर्क सुरूच होता. या प्रेमप्रकरणातूनच हा भीषण प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी स्नेहाच्या आईच्या फिर्यादीवरून अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. प्रेमसंबंधातून घडलेल्या या टोकाच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!