युवानेते सत्यजित तांबे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित, कारवाई करण्यापूर्वी पक्षाने आमची भूमिका जाणून घ्यायला हवी होती – सत्यजित तांबे
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष चांगलाच नाराज झाला असल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबे यांनाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
या निलंबनानंतर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तांबे म्हणाले की, एवढे वर्षे पक्षासाठी काम केले त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी पक्षाने आमची भूमिका जाणून घ्यायला हवी होती. आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून अपक्ष म्हणून आपण लढणार आहोत. असे ते म्हणाले.