मुंबई दि.२९ : जानेवारी : आपल्याकडे अनेक नेत्यांना चांगली भाषणं करता येतात. मात्र, संघर्षाची वेळ आल्यावर हेच नेते मैदानातून पळ काढतात. कोरोनाच्या काळात आपण घरात लपून बसणारे नेते पाहिले असतील. मात्र कोरोनोच्या संकटाच्या काळात, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत घरी बसून न राहता सातत्याने सर्व परिस्थितींना धीटपणे सामोरे जाऊन समाजातील कष्टक-यांची दु:ख समजवून घेत सर्व आव्हानांना थेट भिडणारा नेता म्हणजे प्रविण दरेकर आहे.आव्हानात्मक आणि संक्रमणाच्या काळात दरेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानाच्या वेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं, असे उदगार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांची मुक्तकंठाने कौतुक केले. प्रविण दरेकर यांनी आव्हानात्मक आणि संक्रमणाच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानाच्या वेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं, असे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात प्रविण दरेकर यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले की, प्रविणजी आपल्या भाषणात व्यथित दिसलात, शरद पवार जे बोलले त्यासंदर्भात आपल्याला वाईट वाटलं पण अशा गोष्टींची काळजी करायची नसते. त्यांनी वडीलधाऱ्यांच्या नात्याने सल्ला दिला असं मानून आपल्या कामाचा ठसा उमटत आहे असे समजून पुढे जात राहायचं. विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात पवार साहेबांची सवय जुनी आहे. विरोधी पक्ष नेते तोडपाणी करतात असे ते एका विरोधी पक्ष नेत्याबद्दल बोलले होते, पण तेच नेते आता त्यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही तुमच्या कामाचं मूल्यमापन पूर्ण महाराष्ट्र करत आहे. कोणालाही विचारलं तर तो हेच सांगेल विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीची उंची वाढवणारे काम तुम्ही एका वर्षात केलं आहे असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.
ज्या वेळेस कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. ज्यावेळी कोरोनाची साथ होती. त्यावेळी दरेकर क्वारंटाईन सेंटर्स, कोविड सेंटर्स येथे जीवाची पर्वा न करता हॉस्पिटलमध्ये भेट देऊन तेथील उपाययोजनातील त्रुटी, रुग्णांच्या व्यथा आणि त्या परिस्थितीत करावयाचे बदल, याविषयी माहिती जाणून घेत होते. महापालिकांच्या आयुक्तांशी चर्चा करत होते. अतिवृष्टीत लाखो शेतकरी संकटात सापडले होते त्यावेळेस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात दरेकर यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचे पंचनामे असतील, पीक विम्याचे अर्ज असतील, तातडीची मदत असेल, नुकसानीचे पॅकेज असेल, याबाबतीत सरकारला जाग करण्याचे काम दरेकर यांनी केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये’, या उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य करणे हेच आमचं यश आहे. पण केवळ विदर्भाचं रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रविण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. भाजपाकडे मी कधीच काहीही मागितलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला न सांगता न मागता मला आमदार केलं आणि तसंच विरोधी पक्षनेतेपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली. महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार जेव्हा बोलले की मी पण विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता होता त्याचे मला शल्य आहे. पवारांच्या या वक्तव्यावर मला वाईट वाटले. त्यामुळे मी पवार साहेबांना पत्र पाठवलं आणि आज पुस्तक प्रकाशनानंतर वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाची प्रतही पाठवतोय. त्यांनी पुस्तक वाचावे त्यानंतर त्यांना विरोधी पक्ष नेते पदाची लाज वाटणार नाही. ते माझ्या विरोधी पक्ष नेते पदाच्या कार्याचा आढावा बघु नक्कीच खुल्या दिलाने कौतुक करतील असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
ज्यावेळी जंगलात वादळ येते तेव्हा जंगलातले वाघ गुहेत बसले होते. काही प्राणी सैरावरा पळत होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार व पदाधिकारी सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होते असा टोला दरेकर यांनी लागवला.
आमदार आशिष शेलार आपल्या भाषणात म्हणाले की, जो जनतेसाठी काम करतो तोच जनतेसमोर त्या कामाची मांडणीही ठासून करू शकतो . प्रवीण दरेकर यांनी जास्त वेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत, त्यांनी आता मात्र सुदर्शन चक्र काढावाच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातूनच काढावे असेही शेलार यांनी सांगितले. भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहराम पाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
माजी मंत्री गिरिष महाजन भाषणात म्हणाले की, लेखाजोखा या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. या सोहळ्यात आल्यानंतर आता मला पण असं वाटत आहे, की मी माझ्या कारकिर्दीचा आढावा घेणारे पुस्तक मी काढायला पाहिजे. मी गेले अनेक वर्ष काम करत आहे. माणूस समाजामुळे ओळखला जात नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखला जातो. प्रविण दरेकर हे त्यांच्या कर्तुत्वामुळे ओळखले जातात. महाराष्ट्रात आलेल्या संकाटाच्या काळात क्वारंटाईन सेंटर्स, कोविड सेंटर्स येथे जिवाची पर्वा न करता ते सगळीकडे पोहचले. कोकणात आलेल्या वादळात शेतकऱ्यांच्या मदतीला सर्व प्रथम धावून गेले. प्रविणजी यांनी खुप कमी वेळात मोठी कामगिरी केली. आज ते भाजपचे झुंझार नेते म्हणून ओळखले जातात, असे गिरिष महाजन यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, प.पू.सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांनीही आपल्या भाषणात दरेकर यांनी त्यांच्या कार्याबददल शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विधिमंडळ गट उपनेते विजय़ (भाई) गिरकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रसाद लाड, आमदार राहुल नार्वेकर,आमदार जयकुमार रावल, आमदार मनीषा चौधरी, आमदार परिणय फुके, आमदार श्वेता महाले, आमदार सुरेश धस, माजी आमदार राज पुरोहित, आमदार तमिल सेल्वन, आमदार रमेश पाटील, आमदार निलय नाईक, आमदार योगेश सागर, चित्रा वाघ यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर देखील मान्यवर उपस्थित होते.