ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये ‘संचारबंदी’

पंढरपूर : देशातील अनेक राज्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढलं आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या 9 गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले.

कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन करोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या 9 गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा प्रशासनाने कार्तिकी यात्रा गावोगावी साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा मानस आहे. अन्य जिल्ह्यातील भाविक, वारकरी पंढरपुरात येऊ नये यासाठी पंढपूर शहरात अठराशे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील 6 विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे. 23 आणि 24 नोव्हेंबरला विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन सुरु असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्थाही सुरु आहे. तर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान बंद असलेलं मुखदर्शन पुन्हा 28 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीनं दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!