केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी केली ‘या’ विषयावर चर्चा
सोलापूर,दि.२२ : मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकाचा आणखी विकास होण्यासाठी सुरू असलेली कामे अधिक वेगाने पूर्ण व्हावीत. अगदी विलंबाने रखडलेले रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण ( इलेक्ट्रिफिकेशन ) जलद गतीने पूर्ण व्हावीत. त्यासह सोलापूर – नवी दिल्ली ही नवी गाडी सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.
मध्य रेल्वे सोलापूरच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मधे खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी
केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. या सर्व मुद्द्यांवर गंभीरतेने कार्यवाही करण्याचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी याप्रसंगी सांगितले.
मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानक विकासाच्या प्रगतीपथावर आहे. उत्पन्न आणि दर्जा यामध्ये सोलापूर रेल्वे स्थानकाने नावलौकिक मिळविला आहे. परंतु, आणखी विकास होण्यासाठी अनेक दिवसांपासून सुरू विलंबाने रखडलेले रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण ( इलेक्ट्रिफिकेशन ) जलद गतीने पूर्ण व्हावीत. ही कामे पूर्ण झाल्यास सोलापूर मध्य रेल्वे स्थानक आणखी प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. सध्या प्लॅटफॉर्म ची कमतरता भासत असून आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवा. तसेच टिकेकरवाडी स्टेशनला टर्मिनल मधे रूपांतरित करावा, जेणेकरून सोलापूर रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल अशी मागणी केली. कोव्हिड अनलॉक नंतर सध्या सोलापूरकरांच्या सोयीसाठी सोलापूर – पुणे हुतात्मा व इंटरसिटी एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू कराव्यात. तसेच सोलापूर ते नवी दिल्ली दरम्यान आणखी एक विशेष गाडी सुरू करावी.
तसेच अक्कलकोट रोड स्टेशनवर क्रॉसिंग काळात बसवा एक्सप्रेस थांबा घेते, मात्र प्रवाश्यांना तिकीट उपलब्ध होत नाही. तरी बसवा एक्सप्रेस थांबा असता अक्कलकोट रोड स्टेशनवर तिकीट उपलब्ध होण्यासाठी आदेश द्यावेत. सोलापूर रेल्वे स्थानक संपूर्णतः सोलार पॅनल करून ऊर्जा बचत करण्याच्या दिशेने वाटचाल व्हावी, अशी मागणी खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी याप्रसंगी केली आहे.