मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलावरून भाजप आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीज बिलांच्या सवलतीचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा अल्टिमेटमच भाजपाचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
राज्याचे उर्जा मंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतू उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांत सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने राज्यातील सरकारला धारेवर धरले असून वाढीव वीज बिलात सवलत देण्यात यावे, नाहीतर मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा इशारा अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे वतीने आज मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाच्या वेळी बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये असलेला बेबनाव पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडला. परंतु जो पर्यंत राज्यातील जनतेला ३०० युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा सुद्धा आ. भातखळकर यांनी दिला आहे.
तसंच, करोनाच्या काळात भरमसाठ व अंदाजे वीज बिल अदा करणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ‘शॉक’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सुद्धा आ. भातखळकर यांनी व्यक्त केला.