ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ

 

उस्मानाबाद, दि. 26 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र यंदा प्रथमच संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रेत्सव भाविकांविना पार पडणार आहे. पुजारी वर्गांनी भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवात तुळजापूरला न येण्याचे आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी आढावा बैठकीत सांगितले.

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे,मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्यासह तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, प्रा. धनंजय लोंढे, भोपे पुजारी मंडळाचे सुधीर कदम, संजय सोंजी, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, सचिव श्रीराम आपसिंगेकर, मंदिर संस्थानचे जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदीजण उपस्थित होते.

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्वात कोरोनोच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळून सर्व विधी पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचे निश्चित करण्यात आले. मंचकी निद्रेसह, घटस्थापना, छबिना, सर्व अलंकार पूजा, सीमोलंघन आदी सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडणार आहेत. मात्र पुजारी, सेवेकरी यांच्या संख्येवर मर्यादा असणार असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सगळ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. सीमोलंघन सोहळ्यासाठी मोजक्याच पलंग, पालखीच्या मानकऱ्यांना परवानगी असणार आहे. तर नवरात्रोत्सवात पुजारी वर्गांनी भाविकांना तुळजापूरला न येण्याचे आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी यावेळी सुचित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!