ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये येऊ द्या, त्यांना….ब्राह्मण महासंघाचा इशारा

शिर्डी ।  भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज शिर्डीत दाखल होत, मंदिर संस्थानकडून लावण्यात आलेल्या बोर्ड हटवण्याचा इशारा दिला आहे. तर तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये येऊ द्या, त्यांना शेंदूर लावून भगवी शाल द्यायची आहे, अशी अजब मागणी ब्राह्मण महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

 

तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यानंतर शिर्डीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवेशबंदी करण्यात आली असूनही त्यांनी शिर्डीत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. अशावेळी ‘त्यांना अटक करु नका, शिर्डीमध्ये येऊ द्या. शेंदूर हा दगडालाही देव बनवतो. त्याला अनुसरुनच या विकृतीची पापे नष्ट व्हावी म्हणून, देसाई यांना शेंदूर लावून भगवी शॉल देऊ इच्छित आहोत’, अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आहे. तसं विनंती पत्रच शिर्डी पोलिसांना देण्यात आलं आहे.

 

तृप्ती देसाई यांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन ब्राह्मण महासंघही आक्रमक झाला आहे. आज शिर्डीमध्ये तृप्ती देसाईंना विरोध करण्यासाठी ब्राह्मण महासंघ आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना नोटीस बजावली आहे.

 

शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोशाखात येण्याची विनंती केली आहे. तसा फलक शिर्डी संस्थानकडून लावण्यात आला आहे. याला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. आज शिर्डीमध्ये जात मंदिर संस्थानने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच असा निर्धारच देसाई यांनी पुण्यात बोलून दाखवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!