ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी दिली. कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा आयोजित केली जाते. दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीची परीक्षा घेतली जाते. तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात होते. मात्र कोरोना संसर्गामुळे यंदा शैक्षणिक वर्ष उशिराने सुरु झालं आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. हाच ताण कमी करण्यासाठी यंदा परीक्षा उशिराने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील करोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!