मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, ‘रेणू शर्मानी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सातत्य पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो. आमचा निर्णय बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळे आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कौटुंबिक कारण देत धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.