मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे चर्चेत आहेत. हीच संधी साधत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राजकीय वर्तुळात मुंडे यांच्या आरोपामुळे ठाकरे सरकार अडचणीत येणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र, ही शक्यता धुडकावून लावत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंडे आरोप प्रकरणावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील असे वक्तव्य केले आहे.
भाजप नेत्यांनी मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राऊत म्हणाले, की धनंजय मुडें यांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्यावर राजकारण करू नये. हा राजकारणाचा मुद्दा नाही. कौटुंबिक विषयात राजकारण करु नये. तसेच, महाविकास आघाडीला या घटनेमुळे कोणताही धोका नाही हे स्पष्ट करत त्यांनी राज्य सरकार अडचणीत येईल हा विरोधकांचा भ्रम असल्याचे म्हटले आहे. शरद पवार अनुभवी नेते आहेत. मुंडे यांच्या प्रकरणावर ते योग्य तो निर्णय घेतील, असे राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राऊत यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. केंद्राने शेतकऱ्यांसाठी दोन पावले मागे घ्यावीत. कृषी कायदे मागे घेतल्याने केंद्राची प्रतिमा उजळेल असे सांगत केंद्राने शेतकऱ्यांसोबत समन्वय साधावा. असे राऊत म्हणाले. तसेच, भाजपला त्यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छादेखील यावेळी दिल्या.