अक्कलकोट, दि.१७ : परतीच्या पावसामुळे
केवळ एका विशिष्ट भागाचेच नुकसान झालेले नाही तर ते सगळीकडेच झालेले आहे.त्याचा अक्कलकोट तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पंचनाम्याची काळजी करू नका,आपल्याला सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू,असा दिलासा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांना दिला. शनिवारी, दुपारी पालकमंत्री भरणे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक, शिरशी, बोरी उमरगे आणि रामपूर गावांना भेटी देत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते. या दौऱ्यात प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अंजली मरोड यांच्यासह पोलिस अधिकारीही सहभागी झाले होते.प्रारंभी त्यांनी सांगवी बुद्रुक येथील गावकऱ्यांची भेट घेत सांगवी पुलावरून बोरी नदीकाठची पाहणी केली.यावेळी बोलताना ते म्हणाले की, नदीकाठच्या परिसरामध्ये केवळ नुकसान झालेले नाही तर अन्य भागातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
त्या सर्व पिकांचे पंचनामे होतील,कोणीही काळजी करण्याचे कारण नाही,त्या संदर्भातले आदेश अधिकार्यांना दिलेले आहेत. काही ठिकाणी विजेचा पुरवठा बंद आहे,शेतीची लाईन बंद आहे, नळपाणी पुरवठा योजना बंद आहे या सर्व नादुरुस्त व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण होऊन जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम काम करत आहे.नुकसानीच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्याचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही कानावर टाकला जाईल आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू,असे ते म्हणाले.यावेळी शिरशी,बोरीउमरगे, रामपूर, सांगवी येथील शेतकऱ्यांनी दोन दिवस झालेल्या परिस्थितीची माहिती त्यांना दिली.यात घरांची पडझड तर झालीच आहे पण जनावरे वाहून गेली, हे न भरून येणारे नुकसान आहे.या सर्व नुकसानीची योग्य भरपाई लवकरात लवकर मिळावी,अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.मराठा सेवा संघाच्यावतीने प्रवीण घाटगे यांनी पूर्व
कल्पना न देता धरणातून पाणी सोडल्याबद्दल पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.या दौऱ्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही मागच्या दोन दिवसात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती पालकमंत्र्यांना दिली. तर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत,असे साकडे घातले.अक्कलकोट तालुका भाजपच्यावतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना आमदार कल्याणशेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांसह निवेदन दिले. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना त्वरित मोबदला देऊन दिलासा द्यावे,अशा प्रकारची मागणी या निवेदनात करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,राष्ट्रवादीचे संतोष पवार,नगरसेवक अशपाक बलोरगी,रासपचे सुनील बंडगर,रिपाईचे अविनाश मडीखांबे,भाजपचे मोतीराम राठोड,सेनेचे संजय देशमुख,
योगेश पवार,अविराज सिद्धे,बसवराज तानवडे,बाबासाहेब पाटील,प्रवीण घाटगे,अमोलबापू कारंडे, शिवराज स्वामी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– मदतीसाठी
दानशूरांनी पुढे यावे
मागच्या दोन दिवसात शेतकऱ्यावर जे संकट कोसळले आहे ते भयंकर आहे.त्यांना तत्काळ मदतीची गरज आहे.या पार्श्वभूमीवर समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे येऊन त्यांना मदत करावी जेणेकरून त्यांना यातून उभे राहण्यासाठी मदत होईल.
दत्तात्रय भरणे,पालकमंत्री