पायी दंडवत पालखी सोहळ्याची वटवृक्ष मंदीरात सांगता,वाटेगांव येथील संत बाळू मामा मंदीराचे धार्मिक उपक्रम
अक्कलकोट : सातारा जिल्ह्याच्या वाटेगांव येथील संत श्री बाळू मामा मंदीराच्या वतीने स. स. महेश सरस्वती महाराज यांच्या वाटेगांव ते अक्कलकोट पर्यंत पायी दंडवतीने आयोजन करण्यात आलेल्या दंडवत पालखी सोहळ्याची सांगता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात झाली. यावेळी वटवृक्ष मंदीरातील श्री स्वामी महाराजांच्या पावन चरणी या पालखीची पुजा व आरती करण्यात आली.
या पायी दंडवत पालखी सोहळ्याच्या वटवृक्ष मंदीरातील सांगता समारंभाप्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्य तिर्थक्षेत्र विकास प्रमुख सरस्वतीजी महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.डाॅ.किरण महाराज बोधले, ह.भ.प. परमेश्वर महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी वटवृक्ष मंदीर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी महेश सरस्वती महाराज, बोधले महाराजांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला.
यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी समर्थ महाराज हे या संपूर्ण विश्वाचे आधार आहेत. त्यांनी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या ब्रीद वाक्यातून संपूर्ण विश्वाला निर्भयतेचा संदेश देवून त्यांच्या भक्ती मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण करण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे आज गुरूवारच्या पर्वकाळावर आम्ही देखील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेवून धन्य झालो असल्याचे सांगून स्वामींच्या भक्ती मार्गात आम्ही आल्याने त्यांचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी रहावे, याकरिता स्वामींच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी वटवृक्ष मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, ओंकार पाटे, गणपत भोईर, दत्ताराम लाड, संजय लघाटे, गिरीश पवार, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी, महादेव तेली, संतोष जमगे आदी उपस्थित होते.