अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यात आठ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा परिस्थितीत सरकारकडून भरघोस मदत मिळेल,अशी आशा होती.
परंतु सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे,अशी चर्चा अक्कलकोट तालुक्यातून सुरू आहे.
पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच इतका मोठा पूर अक्कलकोट तालुक्यात येऊन गेला.यामुळे शेतकरी हादरून गेले आहेत. ही परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य नेत्यांची हजेरी या मतदारसंघात लागली. यामुळे फार मोठ्या प्रमाणात मदत मिळेल अशी आशा होती. परंतु शुक्रवारी सरकारने जाहीर केलेली मदत पाहता ही मदत फारच अपुरी आहे,अशा प्रकारची चर्चा गावागावातून ऐकायला मिळत आहे.जिरायत व बागायत जमिनीसाठी दोन हेक्टर च्या मर्यादित प्रति हेक्टर दहा हजार रुपये अत्यंत तोकडी मदत आहे. फळबागासाठी २५ हजार तुलनेने अत्यंत कमी आहे कारण याच्या लागवडीसाठी खर्च मोठा आहे. त्याशिवाय जिरायत आणि बागायत जमिनीमधून जे पीक वाहून गेलेले आहे तेदेखील लाखो रुपयांच्या घरात आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. म्हणजे वीस हजार रुपयांच्यावर शेतकऱ्यांना मदतच मिळू शकत नाही,असा निकष शासनाने लावला आहे.अक्कलकोट तालुक्यात पन्नास पेक्षा अधिक गावात या पुरामुळे शेती, घरे, गुरेढोरे उध्वस्त झालेले आहेत. शेतीचे पंचनामे सुरू आहेत. आता यावरून पुन्हा ही मदत कमी-जास्त होणार आहे. सरसकट पण मदत नाही शेतकऱ्यांना नाराजीचा सूर आहे. झालेले नुकसान पाहता मदत खूप कमी आहे .त्यावरून हेक्टरी किमान २५ हजार रुपये द्यावेत आणि फळबागासाठी ५० हजार रुपये हेक्टरी द्यावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.