ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा ICU मध्ये मृत्यू होणं लाजिरवाणं : फडणवीस

भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा, यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, महाराष्ट्राच्या इतिहासातील ही काळी घटना आहे. फायर ऑडिट का झाले नाही? याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचे नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे, त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

याशिवाय, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिटचा प्रस्ताव 12 मे 2020 रोजी रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालक यांच्या मार्फत संचालक यांच्याकडे पाठविला होता, परंतु त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केला आहे, त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!