अक्कलकोट, दि.२६ : कोविंड -१९ आणि संचारबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली असून त्याअंतर्गत अक्कलकोट शहरात दीडशे प्रकरण मंजूर झाले आहेत.यामुळे फेरीवाल्यांना स्वयंपूर्ण बनण्यास मदत होणार आहे.
सध्या अक्कलकोट शहरातील विविध बँकांकडून कर्ज वाटपाचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्पाधिकारी चंद्रकांत धेंडे यांनी दिली आहे.अक्कलकोट शहराला ४८५ फेरीवाल्यांचे उद्दिष्ट आहे.त्यापैकी ४१० अर्ज पोर्टलला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विविध बँकेच्या पोर्टलला दोनशे अर्ज प्राप्त झाले आहेत.अर्ज आल्यानंतर लाभार्थ्यांना नगरपालिकेकडून शिफारसपत्र दिले जात आहे. रस्त्यावर फुटपाथवर ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फेरीवाले संबोधले जावे आणि त्यांना मदत करावी,असे केंद्र सरकारचे आदेश आहेत.या योजनेतून मंजूर झालेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना १० हजार रुपये मिळणार आहेत.१२ महिन्यात वेळेत फेड केली तर त्यांना ७ टक्के व्याज परतावा केंद्र सरकारकडून मिळणार आहे.जर त्यांनी सर्व रक्कम ऑनलाइनद्वारे फेड केली तर परत सवलत मिळणार आहे.अक्कलकोट शहराची एकूण ४० हजार लोकसंख्या आहे.त्याप्रमाणात प्रशासनाने उद्दिष्ट दिले आहे.आता नगरपालिका पुन्हा त्यांना स्वतंत्र ओळखपत्र आणि विक्री प्रमाण पत्र देणार आहे,असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी धेंडे यांनी सांगितले.त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे निधी
वाटपात अडचण
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे अनेक प्रकरण सध्या बँकेत पडून आहेत पण बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बँका बंद आहेत. पण लवकरच या लाभार्थ्यांना हा निधी मिळणार आहे.