सोलापूर: जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका महिन्यात तब्बल 26 आत्महत्या झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 26 जणांमध्ये 10 महिला तर 16 पुरुषांचा समावेश आहे. या 26 आत्महत्यांपैकी 21 घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. तर, 5 प्रकरणांची नोंद झाली नाही. दरम्यान, सावकारी कर्जाचा पाश आणि व्यसनाधीनता हे प्रमुख कारण या आत्महत्येचे बाबतीत असल्याचं बोललं जातंय. बार्शीतल्या या आत्महत्यांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
26 जणांच्या आत्महत्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. आत्महत्या करणाऱ्यांच्या वयोमानाचा आढाव घेतला असता त्यातील 10 जण हे 20 ते 40 वयाचे आहेत. आत्महत्यांमध्ये सावकारी कर्ज आणि व्यसनाधीनता ही प्रमुख कारणं समोर येतायत. जर अशा कारणांमुळे महिन्याभरात इतक्या आत्महत्या सतत होत राहतील तर प्रश्न गंभीर आहे. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाई करू, असा सज्जड इशारा देत आहेत. मात्र, प्रत्यक्ष कारवाई केव्हा होणार, आणि बार्शीतल्या या आत्महत्येस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत.
दरम्यान, गंगा भोईटे यांनी कुणीही आत्महत्या करु नये, असं आवाहन केलं आहे. बार्शीत चालणाऱ्या अवैध धंदे, बिअर बार, डान्स बार आणि वाढती गुन्हेगारी यांच्या नादी लागून चुकीचा निर्णय घेऊन मुलांना पोरकं करुन नका असही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळं आत्महत्या?
बार्शी तालुक्यातील सूर्यकांत भोईटे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांची पत्नी गंगा सूर्यकांत भोईटे यांच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या सरी कायम सुरू आहेत. केवळ नोव्हेंबर या एका महिन्यात बार्शी तालुक्यात आत्महत्या केलेले सूर्यकांत भोईटे एकटेच नव्हे तर अशा अजून 25 जणांनी बार्शी तालुक्यात आत्महत्या केल्या आहेत. सूर्यकांत भोईटे यांच्या पाठीमागे त्यांचा दिव्यांग मुलगा तेजस, पत्नी गंगा, आई सुमन आणि भाऊ संतोष असा परिवार आहे, सूर्यकांत हे घराच्या समोरच असलेली धान्याची फडी चालवत असत. मात्र, लॉकडाउन झालं व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं, त्यामुळं तणाव वाढत गेला परिणामी दारूचं व्यसन लागलं आणि भोईटेंनी त्यांच्या जीवनाचा प्रवास संपवला.