नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोरोना लशींसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे. कोविशील्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी सीरम कंपनीने नुकतीच केंद्र सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच सीरमला लशीच्या वापरासाठी परवानगी मिळू शकते. मात्र, त्यापूर्वी मोदी सरकार सीरम कंपनीशी करार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. भारतीय नागरिकांना कोविशील्ड अवघ्या 250 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार आणि सीरम इन्स्टिट्युटमधील हा करार अंतिम टप्प्यात आहे. यावर आता लवकरच चर्चा होऊ शकते. सीरम केंद्र सरकारसाठी किती लशींची निर्मिती करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात सीरम केंद्र सरकारला 6 कोटी डोस उपलब्ध करून देईल, असा अंदाज आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे प्रमाण 10 कोटीपर्यंत वाढवण्यात येईल, असे समजते. ‘सीरम’कडून आतापर्यंत S11 लशीचे 4 कोटी डोस तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या लशीला असणारी मागणी पाहता कोविशील्डच्या 20 कोटी डोसची निर्मिती करण्याची गरज आहे.
केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि वृद्ध व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचे ठरवले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कोविशिल्डचे दोन डोस देणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या यादीतील 3 कोटी लोकांसाठी 6 कोटी डोसची गरज आहे. ही लस साधारण मार्च ते एप्रिल महिन्यात बाजारपेठेत उपलब्ध होईल. खुल्या बाजारपेठेत या लशीची किंमत 500 ते 600 रुपये इतकी असेल.