मुंबई : दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोनाचे चाचणीचे अहवाल असणं अनिवार्य असणार आहे. प्रवाशांनी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत रेल्वे, विमान आणि रस्ते प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार, राजस्थान, दिल्ली, गोवा आणि गुजरात या राज्यातून हवाई मार्गानं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी जवळ आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल जवळ बाळगावा. मात्र, हा अहवाल ७२ तासांमध्ये करण्यात आला असावा, असंही या नियमावलीत नमूद केलं आहे.
जर, प्रवाशांकडे करोना चाचणीचा अहवाल नसेल तर, विमानतळावर स्व खर्चानं करोनाची टेस्ट करण्यात यावी. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरंच, प्रवाशांना विमानतळा बाहेर जाता येणार आहे. अन्यथा, प्रवाशांना त्यांच्या राज्यात पुन्हा परतावे लागणार आहे. त्याचबरोबर, प्रवासी रेल्वे मार्गानं महाराष्ट्रात येत असतील तर त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट मागील ९६ तासांमध्ये केलेली असली पाहिजे.