ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रणजित डिसले गुरूजींना अनावृत्त पत्र….

 

काय गुरुजी हे वागणं बरं नव्हं! तुमचे शिक्षक बंधू त्यांना आतापर्यंत कायमच मुलांना शिकवायला किती अडचणी आहेत, अशैक्षणिक कामे, खिचडी शिजवणे, निवडणुकांचे कामे, निरनिराळे सर्व्हे याच अवडंबर करून सहानुभूती मिळवीत होते. सरकार कोणाचेही येवो त्यावर टीका करून आगपाखड करण्यात धन्यता मानत होते.

वेळेवर पगार होत नाही, शासन कायम निरनिराळ्या कामाला जुंपून, मानगुटीवर बसून किती काम करून घेते याची हातभर यादी आणि रडगाणं शाळेतल्या पोरांचा पुढे त्यांच्या आईबापापुढे समाजापुढे करीत होते.
सगळं कसं छान चाललं होतं.

आम्हाला वाटलं तुम्ही पण त्यांच्यातलेच पण तुम्ही कोणत्या जन्माचा दावा साधला हो, त्यांना समाजापुढे पार नंग उघड करून ठेवलत की तुम्ही, कुठे फेडाल हे पाप? त्यांनी आत्तापर्यंत शासनाविरुद्ध आवाज उठव, आंदोलन कर हे करीत आले. आतापर्यंत पगार कसा कमी आहे, पाचव्या, सहाव्या, सातव्या वेतन आयोगात आमच्यावर कसा आर्थिक अन्याय झालाय याची तांत्रिक आणि तर्कशुद्ध मांडणी, युक्तिवाद करीत होते. आणि या साऱ्याचा आमच्या शिकवण्यावर कसा विपरीत परिणाम होतो, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्ता घसरणीला ही सर्व कारणे कशी कारणीभूत आहेत हे ते पटवून देत होते. पण तुम्ही सगळ्यावर पाणी फिरवलं.

पण तुम्ही भलतच काही केलं. इतरांसारख्याच सगळ्या अडचणी असतानाही तुम्ही केवळ तालुक्यात,जिल्ह्यात, राज्यात, देशात नाही तर संपूर्ण जगात शिकवावं कसं हे दाखवून दिलं आणि त्यांची गोची करून टाकली. लोकं आता येड्यावानी शाळा कॉलेजात प्रत्येक शिक्षकात रणजित डिसले पाहतील.

आजवर गावंगन्ना पुढाऱ्याला हाताशी धरून लय तर लई राज्य पुरस्कार, मोठाच वशिला लावून राष्ट्रीय पुरस्कार मिळवायचं माहिती होतं, पण तुम्ही हा जागतिक पुरस्कार मिळवून पार गोची केलीत हो.

काहींनी कर्तृत्वाने जिल्हा परिषद शाळांची वाट लावली त्यामुळे आपोआपच पुढाऱ्यांना गावोगावी इंग्रजी शाळा काढून शिक्षणाचा धंदा उभा करता आला. शिक्षण सम्राट होता आलं. आज त्या इंग्रजी शाळांनाही तुम्ही चव्हाट्यावर आणले त्यांचेही बिंग फोडलं आणि जिल्हा परिषद मराठी शाळा ही जागतिक दर्जाची असू शकते हे सिद्ध केल, हे महापाप तुम्ही कुठे फेडणार? तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे सगळ्यांना आता काम करावे लागतील. कर्तबगारी दाखवावी लागेल.

वर्गातली/शाळेतली/कॉलेजातली पोरं आणि त्यांचे आईबाप आज पर्यंत शिक्षकांच्या नजरेला नजर भिडवत नव्हती. आता त्यांच्या नजरेतून ते प्रश्न विचारतील याचे उत्तर आता त्यांनी कशी द्यायची? एकदा नोकरीला चिकटलं की रिटायर होईपर्यंत कायम रडगाणं गात दिवस ढकलायचे एवढंच अनेकांना माहीत होत.

तुम्हाला अशैक्षणिक कामे, खिचडी शिजवणे प्रशिक्षणे ही सर्व कामे करावी लागत नव्हती का ? या कामातुन सुटका होती का ? जर तुम्हीही ही सारी कामे करत होता तर मग ही कामे इतरांची लंगडी सबब ठरते आहे का ? हायस्कुल व कॉलेज ला तर ही कामे ही नाहीत मग हे सारे कशाच्या मागे लपत आहेत?
तुम्ही रडले नाही, भेकले नाही, कोणाला दूषणे दिली नाहीत, कोणत्याही कामाचं अवडंबर केलं नाही. ही अंत:प्रेरणा, स्फूर्ती तुम्हाला कोठून आणि कशी मिळाली? निव्वळ पाट्या टाकण्या व्यतिरिक्त एवढं जागतिक दर्जाचे अवाढव्य काम करायला तुम्हाला वेळ कसा मिळाला? शिक्षक संघटना, शिक्षकांच्या पतसंस्था, बँका आणि त्यातील राजकारण यापासून तुम्ही अलिप्त कसे राहिलात?

तेव्हा इतरांना रणजित डिसले हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत याचा अभिमान वाटत असेल तर त्यांनी निरनिराळ्या अडथळ्यांवर, संकटांवर त्याचा बागूलबुवा न करता कशी मात केली, कोणतीही सबब सांगितली नाही याचा आदर्श घ्यावा लागेल. मराठी माध्यमाच्या शाळा केवळ टिकवणे एवढेच नाही तर त्या अधिक सक्षम कराव्या लागतील. हे सगळ्यांच्या लक्षात आले, समजले, पटले पाहिजे.
आणि त्याच बरोबर केवळ डी.एड., बी.एड. केलं म्हणून मी बुद्धीने/डोक्याने शिक्षक आहे या पेक्षा मी हृदयातून, अंतकरणापासून शिक्षक आहे, शिकवण हे सर्वस्व आहे हे आतून आलं पाहिजे.
डिसले गुरुजी तुम्ही केवळ तुमच्या शिक्षक बंधूंना मार्ग दाखवण्यासाठी केवळ दिवा नाही तर करोडो वॉटचा सुर्यासारखा प्रखर उजेड दाखवला आहे.

आज अनेक शिक्षक तुमच्याप्रमाणेच खूप मन लावुन, तन-मन-धन अर्पून शिकवतात, चाकोरीच्या बाहेर जाऊन निरनिराळे प्रयोगही करतात, पण त्यांची संख्या एकूण शिक्षकांच्या मानाने खूपच कमी आहे. त्यांना तुमच्या या यशामुळे अधिक चांगले काम करायला स्फूर्ती मिळणार आहे, तर अनेक ज्यांची पाटी कोरी आहे, नवीन आहेत त्यांना तुमच्या निमित्ताने प्रेरणा व मार्ग मिळाला आहे.

तुमच्या भेटीचा योग कधी आला नाही, पण या क्षेत्रात काम करीत असल्याने तुमच्या कार्याची माहिती नेहमी कानावर पडत होती, मिळत होती.
खूप कमी वयात तुम्हाला हे उत्तुंग यश मिळालं आहे, मिळालेल्या पारितोषिकाची रक्कमही तुम्ही जागेवरच योग्य ठिकाणी वाटायला सुरवात केली आहे, त्यामुळे तुमच्या या व अशा कृती पाहिल्यानंतर तुम्ही अतिशय विचारपूर्वक व शांतपणे पुढे जात आहात त्यामुळे तुमच्या डोक्यात या यशाची हवा जाणार नाही याची खात्री आहे.

सत्कार समारंभ, पारितोषिके, मोटिव्हेशनल भाषणे यात आता तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होईल, पण त्यात तुम्ही फार अडकू नका, हे खरं तर तुमच्या आगामी कामातील, कार्यातील अडथळे ठरू शकतात, मूळ कामापासून तुम्हाला भटकवू शकतात.

आम्हा भारतीयांना खूप मोठ्या कालावधी नंतर असा शिक्षक तुमच्या रूपाने मिळाला आहे, तुमचे हे शिक्षकपण कायम अबाधित राहावे ही प्रार्थना! तुमच्या उत्तुंग यशासाठी हार्दिक अभिनंदन!!

राजेंद्र धारणकर
अध्यक्ष,सिस्कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!