सोलापूर,दि.11: जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, पोलीस उपायुक्त रुपाली दरेकर, ग्रामीण वाहतुक शाखेचे निरीक्षक प्रविण सपांगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, नगरअभियंता संदीप कारंजे, सोलापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता विष्णू कांबळे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला श्री. डोळे यांनी जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे सांगितले.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आणि शहरातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट हवी. कारण अपघाताची संख्या कमी होण्याबरोबरच मृत्यूची संख्याही कमी होण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित येवून काम करण्याची गरज आहे. अपघात कमी करण्यासाठी लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील अपघात प्रवण ठिकाणे कमी होण्यासाठी उपाय आखले जावेत. जनतेमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत साक्षरता करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग करुन घ्यावा.
लॉकडाऊनमुळे घटले अपघात, मृत्यूचे प्रमाण
गेल्या वर्षात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शहर आणि जिल्ह्यातील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2019 च्या तुलनेत अपघातांच्या टक्केवारीत 35 टक्के, मृत्यूच्या प्रमाणात 25 टक्के तर जखमींच्या प्रमाणात 30 टक्के घट झाली आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार अपघातात 35 टक्के, मृत्यूच्या प्रमाणात 22 टक्के आणि जखमींमध्ये 37 टक्के घट झाली आहे. मात्र यापेक्षा अजूनही प्रमाण घटण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत हुतात्मा एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस आणि इतर रेल्वे बंद असल्यामुळे अनेक नागरिकांनी दुचाकी आणि खाजगी वाहनातून प्रवास केला. त्यामुळे अपघाताची संख्या वाढल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक एलियास सय्यद यांनी सांगितले. बैठकीत श्री. झेंडे, श्री.कदम आणि श्रीमती दरेकर यांनी आपली मते मांडली .