मुंबई : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल यांना दिली.
या यादीत अभिनेता व नाम फाऊंडेनच्या माध्यातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत मकरंद अनासापुरे, साहित्यिक विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, क्रिकेट खेळाडू झहीर खान, लोककला क्षेत्रातील श्रीमती मंगलाताई बनसोडे, सामाजिक कार्य व पत्रकारिता अमर हबीब, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर, आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, आरोग्य क्षेत्रातील डॉ. तात्याराव लहाने, सामाजिक कार्यातून डॉ. प्रकाश आमटे, सामाजिक कार्य व प्रबोधन सत्यपाल महाराज व कृषी अभ्यासक क्षेत्रातून बुधाजीराव मुळीक या नावांचा समावेश आहे.
सदाभाऊ खोतांनी राज्यपालांची भेट घेऊन ही नावं सुचवल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी राज्यपालांकडे इतरही मागण्या केल्या आहेत. वाढीव वीजबील माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत करावी, अशा आशयाच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत.