ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज;यंदाची दिवाळी होणार गोड

 

मुंबई, दि.१२ : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जात महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री  ठाकूर म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!