ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबई । राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. पण अचानक हवामानात बदल होऊन राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धाकधूक आणखी वाढली आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

 

राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला. अशा अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. हेच वातावरण पुढचे काही दिवस असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे.

 

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

सततच्या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक कांद्याचे रोप खराब झाले तर लागवड केलेला उन्हाळ कांद्यावर मावा, करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मोठ्या प्रमाणावर कांदे मरत आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यात कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यानंतर झालेल्या नुकसानीतून स्वतःला सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा आणि गव्हाची पेरणी केली आहे. मात्र, पुन्हा अवकाळी पावसाचे वातारण तयार झालं असून मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!