ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लग्नसराईत सोन्याचा ‘सुवर्ण’ झटका : दर पुन्हा भडकले; चांदी मात्र स्वस्त !

मुंबई : वृत्तसंस्था 

लग्नसराईचा मोसम नेहमीच सोन्याच्या व्यवहाराला चालना देतो. मात्र यंदा वाढत्या दरांनी ग्राहकांची मोठी धांदल उडवली आहे. आधीच चढे भाव असताना आज पुन्हा एकदा सोन्यात लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल २७० रुपयांची वाढ होऊन १ तोळ्याची किंमत १,२९,९३० रुपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यात २५० रुपयांची वाढ नोंदवली जाऊन दर १,१९,१०० रुपये या पातळीवर पोहोचले आहेत.

सुवर्ण व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि रुपयातील घसरण यामुळे सोन्याचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरवाढीच्या या पार्श्वभूमीवर चांदी मात्र उलट दिशेने गेली आहे. १ किलो चांदीच्या दरात तब्बल ४,००० रुपयांची घसरण नोंदली गेली असून चांदीचा भाव आता १,८७,००० रुपये इतका आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया प्रथमच ९० च्या स्तरावर घसरल्याने बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे चांदी पुन्हा महागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

लग्नसराईच्या तोंडावर आलेल्या या बदलत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये खरेदीची चिंता वाढली असून ‘सोनं घ्यायचं की थांबायचं?’ असा प्रश्न अधिकच गांभीर्याने उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!