मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी) समन्स बजावले आहेत. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्याच संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी नोटिस बजावली होती. मात्र, त्यांनी ईडीकडे पत्र सादर करत चौकशीसाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना ५ जानेवारी रोजी नव्यानं समन्स बजावले होते. वर्षा राऊत त्याआधीच म्हणजे ४ जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. परंतु, त्यावेळी चौकशी पूर्ण न झाल्यामुळं ईडीने पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना समन्स बजावले असल्याचं समोर येतेय.