ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाचन, श्रवण आणि लेखन सेवा महत्वाची – प्रा. नरेंद्र कुंटे ;श्री गुरुचरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळ्यावेळी प्रतिपादन

 

सोलापूर, दि.१२ : श्री गुरुचरित्र पारायण करताना आपली तीन प्रकारे सेवा होत असते. गुरुचरित्रातील ओव्या जेव्हा आपल डोळ्यांनी वाचतो तेव्हा एक, ती ओवी वाचताना आपण त्याचे उच्चार करतो तेव्हा मुखातून होणारी दुसरी सेवा घडते. अशा प्रकारची ही पारायण सेवा करताना परमार्थाचा मुख्य निकष असा की जसे आपण जन्माला येताना सुख आणि दुःख घेऊन येतो तसेच आपण गुण आणि दोष हे ही सोबत घेऊन येतो. परंतु सद्गुरूंची सेवा करताना आपण घेऊन आलेले दोष कमी होतात आणि सद्गुण वाढतात. परमार्थाच्या सेवेमध्ये व्यक्तीचं परिवर्तन होणे ही सद्गुरूंची कृपाच असते. आपल्याला जीवनाचा प्रवास मिळालेला आहे परंतु आत्म्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी गुरुचरित्र अशा पवित्र ग्रंथांचे पारायण करणे गरजेचे आहे, असे विचार प्राध्यापक नरेंद्र कुंटे यांनी यावेळी मांडले.
वेदशास्त्र संपन्न श्री दादा शिरशिकर यांनी दत्त महाराजांची सेवा खूप अवघड आहे, ती करताना पोलादा सारखे तापावे लागते. संसार आणि सेवा अशा स्थितीतून मार्गक्रमण करावे लागते. कोणत्याही देवतेच्या सेवेमध्ये प्रारब्ध नष्ट होत नाही परंतु दत्तात्रयांच्या सेवेमध्ये प्रारब्ध नष्ट होते असे त्यांनी सांगितले. कडगंची येथील श्री शिवशरण आप्पाजी यांनी कडगंची स्थान श्री सायंदेव आणि श्री गुरुचरित्र याची माहिती विस्तृतपणे उपस्थितांना करून दिली.

श्री दत्त संप्रदायामध्ये (वेदतुल्य )असा मानाचे स्थान असणारा ग्रंथ ( श्री गुरुचरित्र) हा ग्रंथ कडगंची येथे लिहिला गेला. ते स्थान कडगंची आहे सायंदेव दत्त देवस्थानकडून आज गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२० तसेच दीपावलीतील गुरु द्वादशी वसुबारस या दिवशी या श्री गुरुचरित्र या पवित्र अशा ग्रंथाचा पुर्नप्रकाशन सोहळा गणपती घाट येथील दत्त मंदिरात झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदशास्त्र संपन्न विठ्ठल शिरसीकर तर दत्तसंप्रदायाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक  कुंटे व कडगंची देवस्थानचे अध्यक्ष शिवशरण मादगोंड अप्पाजी, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष  विक्रम खेलबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सकाळी ११ वाजता गणपती घाटावरील श्री दत्त मंदिर येथे हा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी येथे कडगंची येथील श्री करुणा पादुकाही भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भगवान परलीकर व रामेश्वर विभूते यांनी केले तर आभार झाड जेम्स अँड ज्वेलर्सचे प्रो. प्रा. प्रेमनाथ झाड यांनी मानले. यावेळी आनंद कुलकर्णी, प्रकाश राजोपाध्ये, सुनील जाधव उपस्थित होते.

सरदहू ग्रंथ हा ७४९१ ओव्या व ९२७ पानांचा असून प्रकाशन मुल्य ५५० रूपये अाहे. परंतू दत्त भक्तांच्या सेवेखातर प्रकाशनस्थळी व प्रकाशनानंतरही हा ग्रंथ ५० रुपये सवलत (५००) रुपयामध्ये सवलतीच्या दरात सोलापूरात उपलब्ध आहे. सोलापूर सराफ कट्ट्यातील मंगळवार पेठ पोलिस चौकीच्या समोर असणाऱ्या झाड जेम्स अँड ज्वेलरी तसेच हेरीटेज मंगल कार्यालयासमोरील झाड बॅग मॉल येथे हा ग्रंथ उपलब्ध असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!