ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि…..शिवसेनेकडून पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही आज पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हत्तीची चाल, वजिराचा रुबाब असं म्हणत पवारांसारख्या शक्तिमान राजकारण्याला उदंड आयुष्य लाभो असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच शरद पवारांच्या कामाचे आणि एकूण राजकीय कारकिर्दीचे देखील कौतूक करण्यात आले आहे.

 

’80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!’ अशा शब्दात शिवसेनेकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

देशाचे सगळ्यात अनुभवी नेते, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार शरद पवार हे आज रोजी 80 वर्षांचे झाले आहेत. कोविडचे संकट नसते तर श्री. पवार यांच्या 80 व्या वर्षपूर्तीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला असता, त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेल्या पवारांनी चाहत्यांच्या या उत्साहावर बंधने घातली आहेत. ‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात

 

80 व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे श्री. पवार हे 80 वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत. पवार स्वतःच ‘सह्याद्री’ बनून देशाचे नेते झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!