ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेचं ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढवणार

मुंबई – आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा निर्णय शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले.

 

शिवसेना नेते अब्दुल सत्तार याबाबत माहिती देताना म्हणाले, राज्यात आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.

 

औरंगाबादची महापालिका निवडणूक कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या काळात ती होण्याची शक्यता आहे. येत्या काळात नाशिक महापालिकेची निवडणुकही होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपानेही कंबर कसली आहे. या निवडणुकांच्या आधी झालेल्या विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका या लिटमस टेस्ट ठरणार असल्याने भाजपसाठी महत्वाच्या होत्या. मात्र, त्यात त्यांना पाचपैकी एकाच जागेवर समाधान मानावे लागल्याने आता पुढील निवडणुकांमध्ये त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे मोठे आव्हान असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!