मुंबई – केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधा देशात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज खासदार संजय राऊत गाझीपूर सीमेवर जाणार आहे. संजय राऊत हे दुपारी १:०० गाजीपुर सीमेवर पोहचणार आहे. त्यानंतर ते भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांची भेट घेणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
ट्विट करून दिली माहिती
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहे. त्यांच्याच सूचनेवरून आज मी गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दोन महिन्यांपासून सुरू आहे आंदोलन
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले होते. ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, शुक्रवारपासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.