ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना पकडलं कोंडीत

मुंबई ” संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘राज्यात दोन दिवसांचे अधिवेशन घेणारे महाविकास आघाडी सरकार हे आठवं आश्चर्य असल्याची टीका भाजपचे नेते करतात. पण केंद्राने तर हिवाळी अधिवेशनच रद्द करण्याचा निर्णय घेतला. मग हे कितवं आश्चर्य आहे?, असा बोचरा सवाल पवार यांनी केला आहे. तसेच ‘भाजपची केंद्रात एक तर राज्यात दुसरी अशी नेहमीच सोयीची व दुटप्पी भूमिका राहिलीय,’ असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्रात विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन कालच संपले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात आला. मात्र, त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली होती. ‘महाविकास आघाडी सरकार हे आठवे आश्चर्यच आहे,’ असा टोलाही भाजप नेत्यांनी हाणला होता. तोच धागा पकडत आता रोहित पवार यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द झाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट् केले असून त्यामध्ये त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!