मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. आज त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी वकिलांची फौज आली आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकेल हा विश्वास मला आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
करोनावरुन आमच्यावर टीका करत आहेत. मात्र राज्याने एकही आकडेवारी पहिल्या दिवसापासून लपवलेली नाही. विरोधकांनी आमच्यावर टीका जरुर करावी आम्हाला काहीही आक्षेप नाही. मात्र आपल्या धारावी मॉडेलचं कौतुक जगाने केलं आहे या गोष्टी विरोधकांना दिसत नाही का? डॉक्टरांची टास्क फोर्स निर्माण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजनाही महाराष्ट्रात योग्य पद्धतीने राबवण्यात आली. याचंही कौतुक झालं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.