मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या निकालांमुळं महाविकास आघाडी अधिक घट्ट झाली असं वाटत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.
“आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं.
आघाडी धर्माचं पालन करावं”, असं ट्विट करत यशोमती ठाकूर यांनी सूचक इशारा दिला आहे. काँग्रेस नेतृत्वाची पाठराखण करणारं आणखी एक ट्विट त्यांनी केलंय. “काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे. निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे”, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.