नंदूरबार : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीच्यापुर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी आज महाराष्ट्रात दाखल झाली होती. त्यानंतर त्यांनी आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातील टेंभली येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांचे स्थानिक आदिवासींनी स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे मोदी सरकारने या देशातील उद्योगपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले, पण आदिवासींना एक रुपयांचाही दिलासा दिला नाही, हे सरकार केवळ उद्योगपतींचा विचार करते, असा घणाघात गांधी यांनी मोदी सरकारवर केला.
राहुल गांधी म्हणाले की, बीजेपी तुम्हाला वनवासी म्हणते पण आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो. देशाची पहिली ओळख असलेल्या आधारकार्ड सर्वात आधी आम्ही या नंदुरबारमध्येच का लागू केला. कारण आम्हाला संदेश द्यायचा होता की, आदिवासी हेच मुळ मालक आहेत. येथील जमीन, पाणी, जंगलावर तुमचा हक्क आहे. बीजेपी तुम्हाला वनवासी म्हणते आणि जंगल संपवण्याचे काम करते. जंगल, जमीन हे सर्व अदानी सारख्या करोडपतींना दिली जाईल आणि मग बीजेपी तुम्हाला म्हणेल की, तुम्ही वनवासी आहात, जंगल तर राहिलेच नाही. तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशातील 20 ते 25 करोडपती उसलेल्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले. पण आदिवासी बांधवांचा एक रुपयाही माफ केला नाही. महाविद्यालयीन युवा, महिलांचा विचार कधी झाला नाही. एक रुपयांची मदत देखील झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 16 लाख कोटी रुपये ही रक्कम किती मोठी आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. 24 वर्षांला जेवढा मनरेगाला पैसा लागणार होता तेवढा पैसा या 20 ते 25 करोडपती लोकांचा पैसा माफ झाला आहे. यामध्ये अदानी, अंबानी यासारख्या लोकांचा यात समावेश आहे. यांच्याकडे एवढा पैसा आहे की, देशातील 70 कोटी लोकांकडे जेवढा पैसा आहे तेवढा पैसा या बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे आहे. उद्योगपतींसाठी हे सरकार सगळ करत आहे. पण आदिवासी, गरीबांसाठी काहीही करत नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला.