ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यातील रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी, आमदार कल्याणशेट्टी यांनी मानले गडकरींचे आभार

अक्कलकोट : अक्कलकोटसाठी पुन्हा केंद्रीय रस्ते विकास निधीतून 10 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यातून अक्कलकोट ते जेऊर रस्ता 5.5 मिटरचा होणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते विकास व पायाभूत सोयीसुविधा निधीतून 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या मंजूर कामात दोड्याळ ते जेऊर या रस्त्याचे रुंदीकरणांसह सुधारणा करणे यासाठी 5 कोटी रुपये तर शावळ फाटा ते कुडल ते देवीकवठे ते म्हैसलगी यातील प्रमुख जिल्हा मार्ग असलेला 6 किलोमीटरचा मार्ग हा सुधारणा करणे या कामासाठी 5 कोटी रुपये असा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही रस्त्यासाठी एकूण 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

यापूर्वी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात अक्कलकोट ते दोड्याळ रस्त्यासाठी सध्या असलेल्या 3 मिटरचा रस्ता रुंदीकरणातून सुधारणा करून तो 5.50 मिटरचा केला जाणार आहे. आता यावेळच्या निधीतून दोड्याळ ते जेऊर सुद्धा 5.50 मिटरचा होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अक्कलकोट ते जेऊर हा पूर्ण रस्ता 5.50 मिटरचा होणार असल्याने सध्या वाहतुकीला येत असलेले अडथळे दूर होणार आहे.

अक्कलकोट ते जेऊर रस्ता पूर्ण झाला तर सध्या सुरु असलेली तडवळ, मुंढेवाडी व कोर्सेगाव पर्यंत रस्ता येत्या काळात पूर्ण होऊन अक्कलकोट ते कोर्सेगावं रस्ता पूर्ण चांगला होणार आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी तिलाटी गेट वळसंग धोत्री मार्गे मुस्ती ते तांदुळवाडी, अक्कलकोट ते नागणसुर मार्गे बोरोटी सीमा, वागदरी ते भुरीकवठे तसेच धोत्री ते हन्नूर, चुगी, किणी ते काजिकणबस रस्ता यासाठी कोट्यावधीचा निधी दिलेला आहे.या भागात गेल्या अनेक वर्षांपासून सदरचे कमी अंतराचे आणि महत्वाचे रस्ते व्हावेत, अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. शेतमाल व इतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी व तालुक्यासाठी जोडणारे ठरणार आहेत. हे दोन्ही रस्ते केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीवरून केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंजूर केला आहे.

सीमा भागासह माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी माझे वैयक्तिक लक्ष असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो सार्थ ठेवण्यासाठी प्रयत्न राहील. येत्या काळात केंद्र व राज्य शासन मार्फत उर्वरित रस्ते सुद्धा नवीन होण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!