सौर ऊर्जेचा शिरवळ पॅटर्न गावोगावी राबविण्याची गरज ; प्रत्येक ग्रामपंचायतीने मनात आणल्यास शक्य, वीज बिलाची होणार बचत
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२० : तालुक्यातील ग्रामपंचायतींना येणारे लाखो रुपये
वीजबिल टाळण्यासाठी आता जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करण्याची गरज आहे. कारण असा प्रयोग तालुक्यामध्ये भुरीकवठे आणि शिरवळ ग्रामपंचायतीने केला आहे. कमी खर्चामध्ये विज बिल वर्षानुवर्ष टाळता येतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शिरवळ पॅटर्न तालुक्यात राबवण्याची गरज आहे.
अनेक वेळा ग्रामपंचायतीची कर वसुली होत नाही. ग्रामपंचायतीला अन्य माध्यमातून चांगले उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेचे लाखो रुपये बिल ग्रामपंचायतीच्या खात्याला लागते. अशावेळी महावितरणकडून देखील कारवाई होऊन कधी कधी वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे पाणीपुरवठयात व्यत्यय निर्माण होतो.याचा फटका संपूर्ण गावकऱ्यांना बसतो.
गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे परंपरागत पद्धतीने ही प्रक्रिया गावोगावी सुरू आहे. आता हे प्रक्रिया बदलण्याची गरज आहे. सध्याचे युग आधुनिक आहे डिजिटल आहे रोज नवीन नवीन गोष्टींचा शोध लागत आहे. यात आता सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पंप सौर उर्जेवर चालू शकतो हे सिद्ध झालेले आहे. परंतु त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला नाही.चांगल्या गोष्टी व्हायरल व्हायला जरा वेळ लागतो. याचा अभ्यास तालुक्यातील ग्रामपंचायतीनी करण्याची गरज आहे. जर हा पॅटर्न तालुक्यात सगळीकडे राबवला तर ग्रामपंचायतीचा विज बिलावर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे आणि तो खर्च अन्य विकास कामावर खर्च करता येतो.
शिरवळ ग्रामपंचायतीने या सौर उर्जा प्रकल्पावर केवळ सहा लाख रुपये खर्च केले आहेत मात्र वर्षानुवर्षे आता या प्रकल्पाचा देखरेखीचा खर्च वगळता इतर खर्च काही नाही. त्यामुळे हा पॅटर्न प्रत्येक ग्रामपंचायतीला परवडू शकतो. त्यामुळे शासनाच्या योजनेतून हा सौर ऊर्जा प्रकल्प एकदा जर प्रत्येक ग्रामपंचायतीने बसविला तर प्रत्येक ग्रामपंचायतीचा वीज बिलावरचा खर्च वाचणार आहे. यासाठी प्रत्येक गावच्या सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून शासनाच्या योजनेमध्ये बसवून गावपातळीवर याची चळवळ बनवण्याची गरज आहे.
काळाबरोबर आता बदलण्याची गरज आहे. अनेक वेळा पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाला तर पाणीपुरवठा मध्ये व्यत्यय येतो. जर सौर उर्जेवर विद्युत पंप चालला तर पाणीपुरवठयामध्ये व्यत्यय येणार नाही ही एक चांगली बाब आहे. अक्कलकोट सारख्या शहरासाठी देखील वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठयावर पर्याय म्हणून ही योजना साकारण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नगराध्यक्षांनी देखील पाठपुरावा करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
★ आर्थिक ताण कमी होईल
आम्ही तर ही योजना यशस्वी करून दाखविले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा प्रकल्प कार्यान्वित करावा. याचा चांगला फायदा ग्रामपंचायतीला होईल आणि ग्रामपंचायतीवर पडणारा जो आर्थिक भार आहे तो कमी होण्यास मदत होईल – बसवराज तानवडे,सरपंच शिरवळ