चांदीच्या व्यापाऱ्याचा हिरोळी सीमेवर चक्कर येऊन मृत्यू , पोलिसांच्या सतर्कतेमुळे साडेचार लाख रुपये व ४ किलो चांदी सुरक्षित
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिरोळी – वागदरी बार्डरवरील श्री. भाग्यवंती देवीच्या मंदिरासमोर वागदरीकडे जाणाऱ्या रोडवर एका ७१ वर्षीय व्यापा-याचा पायी चालत जात असताना अचानक चक्कर येउन खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत गणपती एखंडे ( वय ७१ वर्ष) रा तळंदगे ता. हातकंणगले जि. कोल्हापूर असे मयताचे नांव आहे.
वागदरी येथे तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी एस. आर. राऊत, ए.बी. राठोड यांनी मयताला प्रथमोपच्चार व वैद्यकिय मदत मिळवुन देतानाच मयताकडे असलेल्या चार लाख ४६ हजार रूपये रोख रक्कम व सुमारे तीन ते चार किलो चांदीची वस्तू अंदाजे किंमत एक लाख असे सुमारे साडेपाच लाख रूपयाचा ऐवज हस्तगत केला. याची उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली असुन खबर शेतकरी शिवकुमार इरय्या मठपती (वय २८ वर्ष) रा. वागदरी यांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, घटना घडल्यानंतर १०८ अँन्बुलन्स बोलावून घेउन त्यावरील डॉक्टर उमेष कराळे यांनी तपासुन पाहिले असता मयत झाल्याचे सांगितले. मयताचे अंगावरील कपडे तपासून पाहिले असता मयताचे खिशातील कागदपत्रावरून ओळख पटली. मयताच्या मोबाईलमधील डाईल केलेला मोबाईल नंबरवरून नातेवाईकांना संपर्क केला.
घटनास्थळाला पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांनी भेट दिली. मयताचा जागेवर पंचनामा करून रोख रक्कम व चांदी पोलीसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांची माणुसकी
वागदरी बॉडर्रवर असलेले पोलीस कर्मचारी एस. आर. राऊत, ए.बी. राठोड यांनी मयताला प्रथमोपच्चार व वैद्यकिय मदत मिळवुन देतानाच त्यांच्या कडील ऐवजाचे पण रक्षण केले हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीचे मी पुरस्कार मिळण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे – गोपाळ पवार,पोलीस निरीक्षक उत्तर पोलीस ठाणे