मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागीदारी करण्यात आली. यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे हे सध्या दावोसमध्ये आहेत. एमएसटीएआर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भागीदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल. प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल, रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या आणि तपासणी करण्यात येतील, असेही शिंदे म्हणाले