बारावीच्या विद्यार्थ्यांने दिल्लीच्या राष्ट्रीय कला उत्सवात जिंकले रौप्य पदक..
खेडगी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा : चेअरमन खेडगी यांनी केला सन्मान
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयाचा बारावीत शिकणारा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याने राष्ट्रीय कला उत्सवात हलगीचे दिमाखदार सादरीकरण करत रौप्य पदक मिळवत खेडगी महाविद्यालयासह अक्कलकोट च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मुंबई येथे झालेल्या राज्य कला उत्सवात सुवर्णपदक मिळवत हा विद्यार्थी राष्ट्रीय कला उत्सवासाठी पात्र ठरला होता.
दिल्ली येथे 9 ते 12 जानेवारी या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय कला उत्सवात तालवाद्य या कलाप्रकारातून हलगीवादन करताना राहुल ने जोशपूर्ण सादरीकरण करत पंचांसह उपस्थित कलाकारांचे पाय थिरकायला भाग पाडले. या स्पर्धेचा निकाल 12 जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि अन्य मंत्रीमहोदय व एन्. सी. आर. टी. ई. चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राहुल गेजगे याला रौप्य पदक बहाल करण्यात आले. या उज्वल यशाबद्दल अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी आणि सी. बी. खेडगी महाविद्यालय परिवाराच्या वतीने चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते राहुल चा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट, उपप्राचार्य प्रा. बसवराज चड्चण, प्र. पर्यवेक्षक प्रा. संजय कलशेट्टी, प्रा. इफ्तेकार खैरादी, प्रा. विलास अंधारे, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. शिवाजी धडके, प्रा. प्रकाश सुरवसे, डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी, डॉ. किशोर थोरे, प्रा. विजया कोन्हाळी, प्रा. वर्षाराणी हत्ताळी, प्रा. आबाराव सुरवसे, डॉ. अशोक माळगे आदींसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सोमनाथ राऊत यांनी सदर विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल गेजगे याने मिळवलेले हे यश संस्था आणि महाविद्यालय परिवारासाठी अभिमानास्पद आहे. राहुल च्या या कामगिरीमुळे महाविद्यालय आणि अक्कलकोट ची कीर्ती दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचली आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक आणि कलेच्या वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महाविद्यालय परिवार कटिबद्ध आहे.
– बसलिंगप्पा खेडगी, चेअरमन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी.