इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निदर्शने करून महिलांना मोफत लाकडाचे वाटप; केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
सोलापूर – इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून महिलांना मोफत लाकडाचे वाटप करण्यात आले आणि केंद्रातील मोदी सरकारच्या इंधन दरवाढीचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ,हातात निषेधाचे फलक घेऊन , निदर्शने करून इंधन दरवाढीकडे केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधण्यात आले.या आगळ्यावेगळ्या आंदोलची नागरिकांमधून चर्चा करण्यात येत होती. मोदी सरकार हाय हाय,भाजप सरकारचा धिक्कार असो,दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो,महागाई कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
केंद्र सरकारकडून पेट्रोल ,डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये करण्यात आलेल्या अवाढव्य वाढीमुळे सामान्य माणसाचे अक्षरश कंबरडे मोडले आहे.सामान्य माणूस पिचून गेला आहे. याच महागाईमुळे कित्येकांना स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. मागील काही दिवसापासून गॅस सिलेंडरचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून गृहिणींचे बजेट कोलमडून पडल्याने त्या अक्षरशहा त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे गॅस वापरण्याऐवजी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याची दुर्दैवी वेळ महिलांवर आली आहे. तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या बाबतीत देखील दरवाढ झाल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाने यापुढे जगायचं कसं ? असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होतील असे सामान्य माणसाच्या मनात होते .मात्र भारतीय जनता पार्टीने देशातील जनतेची पूर्णतः घोरनिराशा केली आहे.
जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात सातत्याने इंधनाचे दर वाढत चालले आहेत.दररोज सकाळी माध्यमातून येणाऱ्या इंधन दरवाढीच्या बातम्यांनी नागरिकांची झोप उडाली आहे. पेट्रोलच्या दर हे शंभरी पार झालेले आहेत . डिझेलसुद्धा शंभरच्याजवळ आलेले आहेत. घरगुती गॅस ३७५ रुपये होता तो आता १ हजार रुपये झालेला आहे. कोरोनामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये सर्वसामान्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे जगणे अवघड बनले आहे. उपासमारीचे बळी जात असताना केंद्रातील झोपीचे सोंग घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला याचे काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्याबाबतीत जगायचे की मारायचा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे .त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यातीने केंद्र सरकारचा या महागाईच्या विरोधात जाहीर निषेध करतो.
दिवाळी तोंडावर असतानाच महागाईने फटाके फोडायला सुरुवात केली आहे.मात्र आता ही महागाई सहन करण्यापलीकडे गेली आहे.आत्तापर्यंत राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून महागाईच्या विरोधात वाहन ढकलून तसेच निदर्शने करून भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे.आता अखेरचे आंदोलन म्हणून हाच आपल्यासमोर एकमेव पर्याय असल्याने लाकूड वाटप आंदोलन करून मोदी सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी इंधन दरवाढ कमी करण्याबाबत भाजप सरकारने ठोस पावले न उचलल्यास आणखी तीव्र आंदोलन करून मोदी सरकारला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही ,असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिला.
यावेळी प्रशांत बाबर, चेतन गायकवाड, विक्रांत खुणे, संपन्न दिवाकर ,दिपक देवकुळे, मुसा अत्तार, जहीर गोलंदाज, विजय माने, विवेक फुटाणे, इरफान शेख, इशरत नागुरे ,अल्ताफ पठाण ,सुरेश गायकवाड, रोशन वाघमारे, महेश राजगुरू, इस्माईल शेख, इम्रान शेख ,समीर मुल्ला, आसिफ गुंदगुण, मोहसीन मुजावर ,तौकीर शेरी, सरफराज बागवान, इलाही शेख, मुन्ना मुर्गीवाले, सोहेल पटेल, मुजफ्फर बागवान, मोसिन पिरजादे, शोएब बागवान ,सईद सरोडगी, गौस शेख, उमर बागवान, अलमेहराज आबादीराजे ,सोनू पटेल आदी उपस्थित होते.