---Advertisement---

सिंहस्थ कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य; …तर कुणी स्टॉल लावल्यास उखडून टाका’

By team
On: March 15, 2026 11:19 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत, इतरांनी स्टॉल लावण्याचा प्रयत्न केल्यास ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान त्यांनी केले.

नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक व कामगारांच्या सूचीचे प्रकाशन मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी कुंभमेळ्यात हिंदूंकडूनच खरेदी करण्याची संकल्पना मांडली.

यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, ही संकल्पना योग्य आहे. पूर्वी घारघर येथेही मी अशीच भूमिका मांडली होती. त्या वेळी माझ्या वक्तव्यावर माध्यमांनी टीका केली होती. मात्र मला त्याची पर्वा नाही. हिंदू राष्ट्रात हिंदूंबाबत बोलायचे नाही तर मग पाकिस्तान किंवा इस्लामाबादबद्दल बोलायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच कुंभमेळ्यात हिंदूंव्यतिरिक्त इतरांनी दुकाने लावू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या रमजान सुरू असून त्यांच्या अन्नपदार्थांच्या दुकानांमध्ये हिंदू आढळत नाहीत, असे उदाहरण देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी त्यांनी पुढे बोलताना त्र्यंबकेश्वर परिसरातील एका दुकानाचा उल्लेख करत बाहेर दुकानाचे नाव वेगळे असते, मात्र आतमध्ये वेगळ्या व्यक्ती बसलेल्या असतात, असेही सांगितले. कुंभमेळ्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान, राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू असून लव्ह जिहादविरोधात कडक कायदा करण्यात येणार असल्याचेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. मंत्री राणे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून त्यांच्या वक्तव्यावर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!