मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे अतिरिक्त रोहित्र मंजूर : आ.कल्याणशेट्टी,१८ गावातील साडेसात हजार शेतकऱ्यांना होणार लाभ
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढत असताना कमी दाबाचा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.याचा विचार करून सतत पाठपुरावा करून मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे रोहित्र मंजूर करून आणले असून गुड्डेवाडी येथील रोहित्रही येत्या
पंधरा दिवसात मंजूर होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते.
याचा लाभ कुरनूर धरण परिसरातील शेती तसेच भीमा नदी क्षेत्रातील गावातल्या शेतकऱ्यांना होणार आहे.मोट्याळ, कुडल व गुड्डेवाडी येथील रोहित्र पूर्णत्वास आल्यानंतर १८ गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.त्यावर ४ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
यामध्ये मोट्याळ व कुडल येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले असून मोट्याळच्या अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरवर मोट्याळ, सिंदखेड, कुरनूर, कोळीबेट, दहिटणे, चपळगावही गावे येतात.यामध्ये ६.७० किलोमीटर लांबीची ११ के.व्ही. लाईन असून ५ एमव्हीएचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर असणार आहे आणि यांची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये एवढी असणार आहे.
या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा फायदा २ हजार ते अडीच हजार शेतकऱ्यांना होणार आहे. कुडल अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरवर कुडल, देवीकवठा, आंदेवाडी खु, आंदेवाडी बु, हिळ्ळी, शावळ, घुंगरेगांव, कलहिप्परगे व पानमंगरुळ ही गावे येतात. यामध्ये ७.८४ किलोमीटर लांबीची ११ के.व्ही. लाईन आणि ५ एमव्हीएचाचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर असणार आहे. यांची किंमत १ कोटी ५८ लाख रुपये एवढी असणार आहे.
या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा फायदा दिड हजार ते दोन हजार शेतकऱ्यांना होणार आहे. येत्या पंधरा दिवसात निश्चित मंजूर होणाऱ्या गुड्डेवाडी येथील अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मुळे गुड्डेवाडी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरवर आळगे, अंकलगे, खानापूर, शेगांव व धारसंग ही गावे येतात.
यामध्ये ६.४० किलोमीटर लांबीची ११ के.व्ही. लाईन असून ५ एमव्हीएचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर असणार आहे यांची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये असणार आहे.या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा फायदा अडीच ते तीन हजार शेतकऱ्यांना होणार आहे.
या वीज वाढत्या रोहित्रामुळे नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना भेडसावत असलेली विजेची समस्या दूर होणार आहे.