दिंडोरी : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतांना आज पहाटे मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र शाहपुरा येथे दाखल करण्यात आले आहे. गाडीत सुमारे 45 जण होते. बिचिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान हा अपघात झाला. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. सर्वांचे वय 16 ते 60 वर्षे दरम्यान आहे.
पिकअप मालक अजमेर टेकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या वेळी अजमेर हा वाहन चालवत होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जगन्नाथ मरकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकरी अमाही देवरी गावातून मंडला जिल्ह्यातील मसूर घुगरी गावाच्या चौकात कार्यक्रमासाठी गेले होते. परत येत असताना MP20 GB4146 पिकअप नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी होऊन 20 फूट खाली शेतात कोसळला. वाहनाचा विमा आणि फिटनेस कालबाह्य झाला होता.
परिवहन विभागाच्या वेबसाइटवर पिकअपचा विमा फक्त ऑगस्ट 2021 पर्यंत उपलब्ध होता. सप्टेंबर 2022 मध्ये फिटनेसची मुदत संपली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि एसपी अखिल पटेल शाहपुरा रुग्णालयात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिंडोरी आरटीओलाही बोलावले आहे.