सचिन पवार
कुरनूर,दि.२३ : सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातु सय्यद बाबा यांच्या यात्रेला दि. २५ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष यात्रा मोठ्या प्रमाणात होऊ शकली नाही.यावर्षी
मात्र परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम होतील,अशी माहिती सरपंच व्यंकट मोरे व यात्रा पंच कमिटीने दिली आहे.
या यात्रेला केवळ जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक एकत्र येतात. हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या यात्रेचे पाहिले जाते.गेल्या दोन
वर्षात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यात्रेची उलाढाल ठप्प झाली होती.यावेळी मात्र कोरोना आटोक्यात आल्यामुळे सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी दिल्याने ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची माहिती पंचकमिटीने दिली आहे.
गुरुवार दि.२५ रोजी गंध, शुक्रवार दि.२६ रोजी नैवैद्य, दंडवत आणि शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता कुस्त्या व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे नियोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री १० वाजता सरपंच व्यंकट मोरे मित्रमंडळातर्फे ‘लावण्यरंग’ हा कार्यक्रम होणार आहे.त्याचे उदघाटन दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते होणार आहे.तर शनिवारी रात्री १० वाजता युवा नेते राहुल काळे मित्र मंडळातर्फे ‘लावण्यखणी’ हा कार्यक्रम होणार आहे. त्याचे उदघाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे.
तरी यात्रेचा लाभ घ्यावा,असे आवाहन पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.